गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील पाडरा तालुक्यातील मुझपूर गावाजवळील गाभिरा पुल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. या दुर्घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. पुलावरून जात असताना दोन ट्रक, दोन व्हॅन, एक पिकअप आणि एक ऑटो-रिक्शा थेट महिसागर नदीत कोसळली.
पुलाचा स्लॅब तुटल्यामुळे वाहनं नदीत पडली. दुर्घटनेच्या वेळी पुलावर दोन मोटारसायकलीही होत्या, मात्र त्या नदीत पडल्या का, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. दुर्घटना घडल्यानंतर वडोदरा जिल्हा अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक प्रशासन आणि पोलीसही मदतीसाठी घटनास्थळी उपस्थित होते.
जखमींना वडोदरा जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुलाचे वय सुमारे ४० वर्षे असून, गेल्या वर्षी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तज्ञांची समिती नेमून तपासाचे आदेश दिले आहेत.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews