अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत एक “खूप मोठा” व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही नुकताच चीनसोबत व्यापार करार केला आहे. आता भारतासोबतही एक मोठा करार येऊ घातला आहे. तो खूप मोठा असेल आणि भारताला खुलं करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका सर्व देशांसोबत करार करणार नाही, परंतु भारतासोबतचा प्रस्तावित करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, ९ जुलैपूर्वी हा करार निश्चित होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने याआधी भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार सुलभ होण्यासाठी वातावरण तयार होत आहे.
या प्रस्तावित करारात डिजिटल व्यापार, टॅरिफ, बाजारपेठेतील प्रवेश, औषधनिर्मिती, कृषी आणि औद्योगिक उत्पादनांसारख्या क्षेत्रांचा समावेश असण्याची शक्यता आहे. अमेरिका आपल्यासाठी औद्योगिक वस्तू, इलेक्ट्रिक वाहने, वाईन, पेट्रोकेमिकल्स, दुग्धजन्य आणि कृषी उत्पादने यांसाठी सवलती मागत आहे; तर भारताने वस्त्रोद्योग, दागिने, कातडी वस्तू, प्लास्टिक, रसायने, शेतीमाल अशा क्षेत्रांसाठी सवलतींची मागणी केली आहे.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews