हिंजवडी आयटी पार्कच्या विलीनीकरणासाठी ऑनलाईन जनआंदोलनाला वेग

पुणे : हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील नागरी सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाणी आणि वीजपुरवठ्यातील अनियमितता, तसेच कचरा व्यवस्थापनातील अडचणी यामुळे येथील नागरिक, आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी आता या भागाचे थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) विलीनीकरण करण्याची जोरदार मागणी करत आहेत. या मागणीसाठी ऑनलाईन याचिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

ही याचिका वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास आणि कल्याण संघटनेचे सचिन लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. #UNCLOG_Hinjawadi_IT_Park या हॅशटॅगखाली चाललेल्या मोहिमेत हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये हिंजवडी, मान, वाकड, पुणे शहर, चिंचवड, रावेत, पुनावळे, मुळशी, बाणेर, बावधन, आणि इतर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.

पार्श्वभूमी
राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी हे देशातील एक प्रमुख आयटी हब असून येथे पाच लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाळ्यातील जलभराव, वाहतूक कोंडी, अपुऱ्या स्ट्रीटलाईट्स, आणि पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध सरकारी यंत्रणांची जबाबदारी विभागली गेल्याने (MIDC, PMRDA, ग्रामपंचायत, महापालिका) समस्या सुटत नाहीत, अशी तक्रार आहे.

या समस्यांमुळे अनेक आयटी कंपन्या आणि कर्मचारी इतर शहरांकडे वळू लागले आहेत. उत्पादनक्षमता घटली असून, राज्याची प्रतिमाही धूमकेतू झाली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

राजकीय आणि सामाजिक पाठिंबा
या मागणीला राजकीय पातळीवरही पाठिंबा मिळू लागला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या भागासाठी स्वतंत्र प्रशासनिक यंत्रणा किंवा विलीनीकरणाची मागणी केली आहे. “एकाच प्रशासनाची जबाबदारी नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील पावले
या ऑनलाईन मोहिमेला हजारो नागरिकांचा पाठिंबा मिळत असून, राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हिंजवडी आणि मान या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण झाल्यास, एकसंध प्रशासन, सुधारित पायाभूत सुविधा आणि नागरिकांना दर्जेदार जीवनमान मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us on

Instagram : https://www.instagram.com/janbhavnew

Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews

X Account : https://x.com/Janbhavnews


पुण्याहून सिंगापूरला ‘ब्रेक’; एअर इंडियाचं थेट उड्डाण तात्पुरतं थांबलं!

Posted on 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *