पुणे–सिंगापूर थेट उड्डाण तात्पुरते थांबले; प्रवाशांमध्ये नाराजी
पुणे : पुणे येथून सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या थेट विमानसेवेवर तात्पुरती ब्रेक लागली आहे. एअर इंडियाने आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये स्थिरता आणि प्रवाशांना वेळेत सेवा मिळावी यासाठी १५ जुलै २०२५ पर्यंत ही सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही थेट उड्डाण सेवा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. पूर्वी ही सेवा विस्तारा कंपनीमार्फत चालवली जात होती, परंतु विस्तारा आणि एअर इंडिया यांच्या विलीनीकरणानंतर आता AI-2111 या क्रमांकाने ही सेवा आठवड्यातून चार वेळा एअरबस A321 या विमानातून चालवली जात होती. हे विमान पुण्याहून पहाटे २:१० वाजता सुटत असे आणि सिंगापूरला सकाळी १०:३० वाजता पोहोचत असे.
एअर इंडियाने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, संपूर्ण नेटवर्कमध्ये केवळ ५% पेक्षा कमी उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. तीन मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या असून, १९ मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे–सिंगापूर, बेंगळुरू–सिंगापूर आणि मुंबई–बागडोगरा या मार्गांवरील थेट सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, या बदलामुळे प्रवाशांना त्वरित आणि अंतिम क्षणी होणाऱ्या गैरसोयी टाळता येतील. प्रवाशांना पर्यायी उड्डाण, मोफत पुनर्नियोजन किंवा पूर्ण परतावा देण्याची सुविधा दिली जात आहे.
पुण्यातील प्रवाशांसाठी ही सेवा थांबवली गेल्याने आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला असून, आता पुण्यातून केवळ चार थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे उपलब्ध आहेत. अनेक प्रवाशांनी ही सेवा लवकरच पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
एअर इंडियाने सांगितले आहे की, ही तात्पुरती कपात असून, १५ जुलै २०२५ नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews
पुणे मेट्रोने वारीमुळे वाढलेल्या प्रवाशांमुळे दोन दिवसांत नवा विक्रम केला
