पंढरपूर वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरड गावाजवळ घडली आहे.
मृत वारकऱ्यांची नावे तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, नागपूर) आणि मधुकरराव तुकाराम शेंडे (वय ५५, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी आहेत. दोघेही नागपूर येथील निस्सीम विठ्ठलभक्त होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा रविवारचा मुक्काम बरड येथे होता. तंबूत विश्रांती घेत असताना, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधण्याच्या प्रयत्नात लोखंडी रॉडला हात लागताच तुषारला विजेचा जोरदार शॉक बसला. त्याला वाचवण्यासाठी मधुकरराव पुढे आले असता, त्यांनाही विजेचा शॉक बसला. दोघेही जागीच बेशुद्ध पडले. तातडीने १०८ अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेमुळे वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शेंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी सेवा आणि समाजसेवेला वाहिले होते. या अपघातामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांची आस अधुरीच राहिली.
Follow Us on
Instagram : https://www.instagram.com/janbhavnew
Youtube : https://www.youtube.com/@JanbhavNews
X Account : https://x.com/Janbhavnews